LIVE UPDATES

खळबळजनक | धारगळ इथं विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला

Edited by:
Published on: June 30, 2025 11:47 AM
views 1299  views

पणजी :  धारगळ येथील सुकेकुळण भागात सोमवारी सकाळी ७.५० वाजता एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्ये (वय १७) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऋषभ शेट्ये हा विद्यार्थी म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे तो सकाळी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होता. याच दरम्यान, एका दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांपैकी एकाने त्याच्यावर अॅसिड फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला. अॅसिड अंगावर पडल्यानंतर अंग होरपळू लागल्याने ऋषभ सुमारे १०० मीटरपर्यंत धावत गेला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ऋषभचे वडील पोलीस कर्मचारी आहेत.

हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पेडणे पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत ऋषभला तातडीने गोमेकॉत हलवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे.

या हल्ल्याचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होते त्याचा तपास सुरू आहे. पेडणे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करण्यात येतोय.