LIVE UPDATES

ॲसिड हल्ल्याच गूढ ; मुलीच्या बापानं घेतला सूड ?

Edited by: विनायक गांवस
Published on: June 30, 2025 19:20 PM
views 2633  views

सिंधुदुर्ग : गोव्यातील धारगळ  - पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या ॲसिड हल्ल्याचे कनेक्शन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्याशी असल्याचा पोलिसांचा अंदाज अखेर खरा ठरला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळी निलेश गजानन देसाई कळणे याला म्हापसा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. यामागे 'लव्ह स्टोरी' असून मुलीच्या मृत्युचा सूड वडीलांकडून घेतल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबबतचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सोमवार ३० जून २०२५ ला सकाळी अज्ञात दुचाकीस्वारांनी केलेल्या ॲसिड हल्ल्यात १७ वर्षांचा ऋषभ उमेश शेट्ये हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत आहे. सुकेकुळण - धारगळ येथे ऋषभ बसची वाट पाहत थांबला होता. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्यावर ॲसिड फेकले.  जखमी ऋषभ हा म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिकतो. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यातील दोडामार्ग येथील देसाई यांच्या मुलीचा मृत्यू झाला. तीची ही आत्महत्या असल्याचीही चर्चा आहे. प्रेमप्रकरणातून तीन जीवन संपवल्याचा व याला जखमी युवक कारणीभूत असल्याचा संशय मयत मुलीच्या कुटुंबीयांना होता. यातूनच सूडाच्या भावनेतून मयत मुलीच्या वडीलांनी त्या युवकावर ॲसिड हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत गोवा पोलिस काही व्यक्तींचा त्यादृष्टीने शोध घेत होते. त्यादृष्टीने तपास सुरु झाला असून याप्रकरणी दोडामार्ग  - कळणे येथील निलेश गजानन देसाई याला म्हापसा येथे पोलिसांनी अटक केली. सर्व बाजूंनी पोलिस या घटनेची चौकशी करत असून आता संशयित ताब्यात आल्याने या घटनेचा उलगडा होणार आहे. दरम्यान, गोव्यात असे प्रकार खपवून घेणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई होणार अशी माहिती स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे.