दोडामार्ग : धारगळ येथील ॲसिड हल्ला प्रकरणाला वेेगळेच वळण मिळाले असून मुलाच्या नातेवाईकांच्या आरोपांनंतर गुरूवारी ‘त्या’ मुलीचे नातेवाईक दोडामार्ग पोलीस स्थानकावर धडकले अन् मुलीच्या आईने मुलावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप करत पोलिसांना निवेदन सादर केले. माझ्या मुलीच्या मृत्यूस सदर मुलगा आणि मुलाचे आई, वडील जबाबदार असून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. अल्पवयीन मुलीस प्रेमसंबंधातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. यावेळी कुटुंबियांनी पोलिसांसमोर सोशल मिडियाच्या माध्यमातून केलेले संवाद, काही आक्षेपार्ह फोटो सादर केले.
दोन अल्पवयीन मुलांच्या प्रेमसंबंधांतून मुलीच्या वडिलांकडून घडलेले ॲसिड हल्ला प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. सध्या मुलीचे वडील पोलीस कोठडीत आहेत. पण त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुलाच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता मुलीच्या नातेवाईकांनीही दोडामार्ग पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मयत मुलगी ही १७ वर्षीय अल्पवयीन होती. ती म्हापसा येथील एका कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. तर तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारा धारगळ, सुकेकुळण येथील विद्यार्थी विज्ञान शाखेत शिकत होता. इयत्ता अकरावी पासून त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यावेळी मोबाईल, व्हॉटसॲप चॅटिंग, इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरूच होते. शिवाय त्या मुलाचे वडील गोवा पोलीस खात्यात असल्यामुळे मुलाकडून पैशांची उधळपट्टी सुरू होती. सदर मुलाने आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते. आणि त्याचे फोटो त्या मुलाने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. याची पूर्ण माहिती मुलाच्या आईला होती. एक दिवस त्याच्या आईने माझ्या मुलाबरोबर कुठलाही संबंध ठेवू नको, असे म्हणत मुलीला झिडकारले. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या बालमनावर खोल परिणाम झाला. तर दुसरीकडे त्या मुलाने ‘तुझे फोटो माझ्याकडे आहेत, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, पण शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझे फोटो सोशल मिडियावर शेअर करीन’ अशी धमकी दिली होती. अशा विचित्र अवस्थेत माझी मुलगी सापडली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली, अशी कैफियत निवेदनाच्या माध्यमातून सदर मुलीच्या आईने पोलिसांसमोर मांडली. या सर्व घटनांमुळे माझे पती गेले काही दिवस नैराश्येत होते. पोटची पोरगी गमावल्याने त्यांना हे दु:ख सहन झाले नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणात तो मुलगा आणि त्याची आई सर्वस्वी जबाबदार असून मुलीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करू, अशी धमकी मुलाच्या आईने दिल्याने आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्या मुलावर आणि तिच्या आईवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे सर्व पुरावे अर्थात फोटो सिलबंद लखोट्यात दोडामार्ग पोलिसांना सादर करण्यात आले.
निलेश देसाई यांची आर्थिक परिस्थिती बेताची गोवा पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित निलेश देसाई यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. एक १६ वर्षीय मुली आणि ११ वर्षीय मुलगा असे कुटुंब असून पती जेवणाची खानावळ चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे निलेश यांच्या पत्नीचे म्हणणे आहे, असे पोलिसांशी बोलताना तिने स्पष्ट केले.
दोघाही अल्पवयीनांचे शारिरीक संबंध अकरावीत असल्यापासून त्या दोघांचेही प्रेमसंबंध होते. याकाळात अनेकदा त्यांनी शारिरीक संबंधही ठेवले. आणि हे करताना मुलाने काही अश्लील, आक्षेपार्ह फोटोही आपल्या मोबाइलच्या कॅमेर्यात कैद केले. आणि त्यातूनच ब्लॅकमेलींग करण्याचे प्रकार होवू लागले, अशी कैफियत मुलीच्या आईने पोलिसांसमोर मांडली. त्यातूनच त्या मुलीने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
८ मे रोजीच घेतले विष ? मुलाच्या आणि त्याच्या आईच्या विचित्र वागण्यामुळे आणि त्यांनी मुलीला पूर्णत: झिडकारल्यामुळे आपली मुलगी नैराश्येत गेल्याचे मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ८ मे रोजी दु. ११.३० वा. तिने ब्युटिपार्लरच्या कोर्सला जाते, असे सांगून ती दोडामार्ग येथे आली आणि विष प्राशन केले. त्यानंतर तिला उलटी झाली, त्यानंतर तिला कळणे येथे घरी सोडण्यात आले. ९ मे रोजी तिला. मोरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तथून ११ मे रोजी डॉ. उमेश देसाई यांच्याकडे उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला १२ मे रोजी म्हापशात आझिलोत दाखल केले. त्यानंतर १५ मे रोजी बांबोळी मेडीकल कॉलेजमध्ये तिला दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी सदर मुलीने विष प्राशन केल्याचे निदान केले असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शेवटपर्यंत तिच्या तोंडी मुलाचे नाव.... ‘त्या’ मुलीचे सदर मुलावर अतोनात प्रेम होते. त्यामुळेच तिने शेवटचा पर्याय म्हणून विष प्राशन केले. पण कोमात जातानाही शेवटपर्यंत तिच्या तोंडी सदर मुलाचे नाव होते. वारंवार ती ‘त्या’ मुलाचे नाव घेत होती, असे मुलीच्या आईचे म्हणणे आहे.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्लाप्रकरणी कोल्हापुरातील महिला अटकेत
September 21, 2026
Crime News : 'त्या' युवतीच्या आत्महत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
September 21, 2026
पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
September 21, 2026
Rajapur News : पोलीस पाटलांच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला
September 21, 2026





