LIVE UPDATES

अखेर 'त्या' खून प्रकरणातील आरोपी गजाआड

एलसीबीच्या - कणकवली पोलिसांच्या पथकाने बेंगलोर येथून घेतले ताब्यात
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 28, 2025 11:31 AM
views 2323  views

कणकवली : श्रीनिवास रेड्डी (५३, रा. बेंगलोर - कर्नाटक) यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व कणकवली पोलिसांच्या पथकाने बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांना सोमवारी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना घेऊन कणकवली पोलीस कणकवलीच्या दिशेने निघाले आहेत. आज मंगळवारी सायंकाळपर्यंत ते कणकवलीत पोहोचतील असा अंदाज आहे. दरम्यान, ही 'मर्डर केस' 'हाय प्रोफाईल' असून आरोपींची संख्या आणखीन वाढणार असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह चार दिवसांपूर्वी साळीस्ते येथे महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर खून झालेल्या स्थितीत आढळला होता. तर त्याच दिवशी श्रीनिवास रेड्डी यांच्या आईच्या नावे असणारी कार दोडामार्ग तालुक्यात आढळली होती व त्या कारमध्ये रक्ताचे डाग होते‌. पोलीस  तपासामध्ये  मृतदेह व कार यांचे 'कनेक्शन' स्पष्ट झाल्यानंतर एलसीबी व कणकवली पोलीस अशी दोन पथके तपासासाठी बेंगलोरला रवाना झाली होती. गेले तीन दिवस ही पथके बेंगलोर येथे आरोपींचा शोध घेत आहेत. अखेरीस सोमवारी रात्रीच्या सुमारास तीन आरोपींना एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. 

आरोपी ताब्यात मिळाल्यामुळे खुनाचे कारण अर्थातच लवकरच उघडकीस येणार आहे. मात्र सद्यस्थितीत हा खून 'प्रॉपर्टी'च्या वादातूनच झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. तर हा खून साळीस्ते येथेच झाला असावा, संशयितांनी श्रीनिवास रेड्डी यांना ठार केल्यानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथेच टाकला व रेड्डी यांच्या ताब्यातील कार दोडामार्ग येथे सोडून ते पळाले असावेत, असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.