LIVE UPDATES

अवैध दारू वाहतूक करणारा कंटेनर जप्त

तब्बल ५० लाख ६६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2025 14:21 PM
views 474  views

सावंतवाडी : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैध मद्याची वाहतूक करणारा कंटेनर जप्त केला आहे. इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील तपासणी नाका समोर करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ५० लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

२५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने एक सहाचाकी अशोक लेलँड कंटेनर (क्रमांक GJ-17-XX-0871) जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचून सदर वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, वाहनातील १३ मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये 'रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की'चे १८० मि.ली.चे एकूण ६५० बॉक्स (३१,२०० बाटल्या) आढळून आले. हे मद्य केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत होते. विदेशी मद्य: ४०,५६,००० रुपये, कंटेनर: १०,००,००० रुपये,

अँड्रॉइड मोबाईल १०,००० रुपये असा एकूण किंमत ५०,६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक याज्ञेशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५० वर्ष, रा. वडोदरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री आणि सतिश चौगुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.