LIVE UPDATES

सिंधुदुर्गचे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे : मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील पहिल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनचे शानदार उद्घाटन
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 20, 2023 17:51 PM
views 880  views

सिंधुदुर्गनगरी : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी होत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी केले. 



आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन आज झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा देताना म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणेवर भर दिला. त्यांचं स्मारक मराठी पत्रकारांना, भावी पत्रकारांना प्रेरणा देणारं ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करुया. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं ठरेल. भविष्यातही जे जे आवश्यक आहे. ते ते सरकार पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 



शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनीही दूरदृश्य प्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती ती आता साकार झाली आहे. या पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिले जातील.असेही ते म्हणाले.  



या कार्यक्रम प्रसंगी नियोजन भवन येथे आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख, किरण नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, माजी आमदार राजन तेली,  जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, अण्णा केसरकर, नंदकिशोर महाजन, शशी सावंत, गणेश जेठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी उपस्थित होते.   


आपला पेशा पत्रकारितेचा आहे, त्याचं पावित्र्य टिकवणं हा आपला धर्म आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. आपण काय योगदान देतोय याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जावेत, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. 

  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन फित कापून तसेच कोनशिला अनावरण करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन केंद्रीय मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते. 

केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. या स्मारक व भवन उभारण्या पाठीमागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाकडे पाहून चांगले गुण आत्मसात करावेत. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेलं पावित्र्यं जोपासले आहे का? आंगिकारले आहे का? त्याचा अंमल होतो आहे का? याचा विचार मंथनातून व्हाावा. त्यावेळची पत्रकारिता, आता कुठे गेली? याचाही विचार व्हायला हवा. पत्रकारिता हे आयुध आहे. त्यासाठी अभ्यास लागतो. विकास बेकारी, जीडीपी, उद्योगधंदे, रोजगारावर वृत्तपत्रातून मार्गदर्शन व्हायला हवे, त्यासाठी आवश्यक पोषक वातावरण बनवणं पत्रकारांचं काम आहे. पत्रकार परिषदेत विकासावर प्रश्न असावेत. जिल्ह्याच्या विकासाला पोषक, समृध्दीचं वातावरण निर्माण करावं, समाजाला प्रेरणा देऊन उत्तेजन देवून, समाजाचं प्रबोधन करुन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जातील, लिहिले जातील, असं काम व्हायला हवं. आपला जिल्हा देशात समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जावा. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

आमदार नितेश राणे म्हणाले, काळानुरुप पत्रकारितेत झालेल्या बदलांची दखल जिल्ह्यातील पत्रकारांनी घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पत्रकार भवनात व्हावा. या भवनातून विचार मंथन होऊन विकासात्मक पत्रकारिता घडत जावी. जिल्ह्यात एक दर्जेदार पत्रकार भवन उभे रहावे, अशी सर्व पत्रकारांची इच्छा होती ती आज यानिमित्ताने पूर्णत्वास आली आहे. 

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, आज हे स्मारक व पत्रकार भवन पूर्णत्वास आणल्याबद्दल सर्व आजी-माजी पत्रकार व अधिकारी यांचे अभिनंदन केले. राज्यातील जिल्ह्यातील हा प्रशासन व  पत्रकारांनी मिळून एवढा मोठा प्रकल्प पूर्ण केला आहे. हे काम जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी करुन दाखविले. स्मारकाची देखभाल दुरुस्ती पुढे कशी करता येईल, याचेही नियोजन करावे. याही पुढच्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य दिले जाईल.    

प्रास्ताविकात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेचा वारसा कथन केला. या स्मारकासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास सांगितला आणि पत्रकार भवन उभारणी सहाय्य केलेल्या सर्व पत्रकार, प्रशासन व पक्षाचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करुन या भवनाची पुढील वाटचालीचा संदर्भ दिला.

जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम. एम. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली. या निमित्ताने जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. जयानंद मठकर यांचे वारसदार, कै. श्रीधर मराठे यांचे वारसदार, माजी अध्यक्ष गजानन नाईक, संतोष वायगंणकर, वसंत केसरकर शशी सावंत, गणेश जेठे, स्मारकातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या मुर्तीचे शिल्पकार विलास मांजरेकर व वास्तुतज्ज्ञ अमोल नष्टे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, शाखा अभियंता विनायक जोशी, संजय दहीफळे, उपअभियंता युतिका केणी यांना सन्मानित करण्यात आले.


अर्चना घारे-परब यांनी पत्रकार भवनाला शंभर पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन निलेश जोशी व ज्योती तोरसकर यांनी तर आभार प्रदर्शन गणेश जेठे यांनी केले. यावेळी विविध प्रसार माध्यमांतील प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.   


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026