LIVE UPDATES

बारावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

संशयितास अटक
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 25, 2026 19:26 PM
views 425  views

सिंधुदुर्गनगरी : बारावीत शिक्षण घेत असलेल्या एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी विठ्ठल भगवान शिंदे (वय ३१, रा. हिवाळे, ता. मालवण) या संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मालवण तालुक्यातील एका गावातील ही युवती नजिकच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. दररोज बसने प्रवास करत असताना तिची संशयित विठ्ठल शिंदे याच्याशी मोबाईलवरील स्नॅपचॅट माध्यमातून ओळख झाली. पुढे ही ओळख मैत्रीत रूपांतरित झाली.

संवाद वाढल्यानंतर फिरायला जाण्याच्या निमित्ताने संशयिताने युवतीला मोटारसायकलवरून विविध ठिकाणी नेले व त्या दरम्यान तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना १७ डिसेंबर २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर युवतीचे वय १८ वर्षे नुकतेच पूर्ण झाले आहे.

पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१) व ६४ (२)(म) अन्वये २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला सायंकाळी सिंधुदुर्गनगरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी आरोपीला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील करत आहेत.