LIVE UPDATES

ओवळीये महिला हत्या प्रकरण

संशयित बाप - लेकाला ६ दिवसांची पोलीस कोठडी
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 30, 2026 20:36 PM
views 317  views

सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये येथे ६५ वर्षीय महिलेची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित बाप-लेकाला आज सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  या हत्याप्रकरणात वापरलेला कोयता‌ पोलिसांनी जप्त केला असून संशयिताने संबंधित महिलेकडील कोयता घेऊनच हे कृत्य केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

रविवार २९ मार्च रोजी सायंकाळी ओवळीये मधलीवाडी येथील सरस्वती धोंडी सावंत या महिलेची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. याप्रकरणी संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत त्यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मुलाच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जात पंचनामा करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.  या घटनेनंतर त्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भेट देत घटनेची माहिती घेतली.  त्यानंतर सोमवारी दोघांनाही येथील न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी पोलिसांनी पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त केला. 

या दोन्ही कुटुंबामध्ये जमिनीवरून गेली अनेक वर्षे किरकोळ वाद होते. अलीकडेच संशयित विजय सावंत याने सरस्वती यांच्या जमिनीत कोंबड्यांची पोल्ट्री उभारण्यासाठी जांभे दगड टाकले होते. याबाबतचा तक्रार अर्ज मयत सरस्वती सावंत  यांनी आंबोली दुरक्षेत्राच्या पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल केली होता. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन याप्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्या दोघांनाही सोमवारी आंबोली पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच सरस्वती यांची निर्घुण हत्या झाली. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.