LIVE UPDATES

जबरी चोरीतील दोन्ही चोरटे गजाआड

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 26, 2026 11:25 AM
views 272  views

कणकवली :  ओटव -ओटववाडी येथील सुवर्णा नारायण रावले (६६) यांच्या गळ्यातील दोन चेन जबरदस्तीने खेचून पसार झालेले चोरटे साहील मिलिंद रसाळ (२२, रा. वसई - ठाणे) व मुकेश महेंद्र पाटणे (२८, रा. विरार) यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने (एलसीबी) अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मीरा भाईंदरनजीक शनिवारी दुपारी ३ वा. सुमारास मुसक्या आवळल्या. सद्यस्थितीत चोरट्यांना कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजु जामसंडेकर, हवालदार श्री. तवटे, श्री. देसाई, श्री. डिसोजा यांच्या पथकाने केली.

ही घटना २२ एप्रिलला‌ सकाळी घडली होती. सुवर्णा घरात जेवण बनवत असताना त्‍यांचा नातू साईल उर्फ सिध्देश मिलिंद रसाळ व त्‍याचा मित्र यांनी त्‍यांच्‍याशी झटापट करुन गळ्यातील १ लाख रुपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्‍याची चेन आणि ४५ हजाराची साडे नऊ ग्रॅमची सोन्‍याची चेन असा मिळून १ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. दरम्यान, एलसीबी पथकाच्या तपासात साहिल याच्यासोबत मुकेश पाटणे हा देखील ही जबरी चोरी करताना सोबत होता, अशी बाब उघड झाली. पुढील तपासामध्ये दोन्ही चोरटे मीरा-भाईंदर परिसरात असल्याचे एलसीबीच्या पथकाला समजले. त्यानुसार पथकाने मीरा-भाईंदर परिसर गाठला व सापळा रुचून दोन्ही चोरट्यांना अटक केली. एलसीबीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.