सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.३० च्या दरम्यान पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. आंबोली आणि आरोंदा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई आंबोली बस स्थानक परिसरात करण्यात आली. कोल्हापूर येथील मंगळवार पेठेत राहणारा तौसिफ ताजुद्दीन सौदागर (वय ३९) हा एसटी बसमधून प्रवास करत असताना संशयास्पदरीत्या एका पिशवीतून गोवा बनावटीची व्होडका घेऊन जात होता.
पोलीस तपासणी दरम्यान, त्याच्याकडे १२,८०० रुपये किमतीची दारू मिळून आली. बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करत आहेत.
दुसरी कारवाई आरोंदा देऊळवाडी परिसरात करण्यात आली. येथील रहिवासी मागदेलीन अगस्तीन फर्नांडिस (वय ६४) याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेली १८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू पोलिसांना मिळून आली. बेकायदेशीररीत्या दारू बाळगल्याप्रकरणी फर्नांडिस याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अरवारी हे करत आहेत. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांत सहभागी असलेल्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all








