सिंधुदुर्गनगरी : घरात जेवण करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी सचिन राजाराम भामट (३१) रा - घोटगे मळेवाडी, ता -कुडाळ याला दोषी ठरवत तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ सूर्यकांत इंदलकर यांनी २ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
फिर्यादी ह्या घरातील जेवणाच्या खोलीतील ओट्यावरील गॅसवर जेवण बनवित असताना आरोपी सचिन याने मागून येत फिर्यादी यांचा विनयभंग केला होता. या प्रकरणी ३१ मे २०२५ रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, साक्षीदार आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सचिन याला भारतीय न्याय संहिता कलम ७४ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ७५ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ३३२ (सी) अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. ह्या सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ताजी बातमी
View all








