कणकवली : फोंडाघाट येथे दरीत कोसळून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, हा अपघाती मृत्यू नसून त्याचा चार जणांनी मिळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील घाटकोपर क्राईम ब्रॅंचच्या टिमने या प्रकरणाचा छडा लावला आहे. घाटकोपर पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कणकवली पोलिसांचे पथक चारही जणांना ताब्यात घेऊन कणकवलीच्या दिशेने निघाले आहे.
अशपाक मुलाणी उर्फ निहाल (रा. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर, अतिष भगवान मोरे, ऋतूराज शेट्टी हे खून प्रकारणातील आरोपी आहेत. चारही आरोपी मुंबई परिसरात राहणारे आहेत, अशी माहिती घाटकोपर क्राईम ब्रँचच्या पथकाने दिली आहे.
पाच वर्षांपूर्वीची घटना
घटना अशी, पाच वर्षांपूर्वी अशपाक मुलाणी याचा मृतदेह फोंडाघाट येथे दरीत आढळला होता. बाजूलाच दुचाकी देखील असल्याने अशपाक दुचाकीस घाटात कोसळला असावा, अशा निष्कर्षापर्यंत कणकवली पोलीस पोहोचले होते. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंदही झाली होती.
कुणीतरी बरळला अन्...
मात्र, तब्बल पाच वर्षानंतर या घटनेला वेगळेच वळण प्राप्त झाले. अशपाक याला मारणार्या संशयितांपैकी एकजण दारूच्या नशेत या खूनाविषयी बरळला अन् ही बाब घाटकोपर क्राईम ब्रॅंचपर्यंत पोहोचली. घाटकोपर क्राईम ब्रॅंचच्या टिमने बुधवारी सकाळच्या सुमारास चारही संशयितांना बोलावून घेतले. खाकीचा हिसका दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
...असा झाला होता खून
अशपाक व वरील संशयित यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीतून वाद होते. याच वादातून संशयितांनी अशपाक याला कुडाळ येथे एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. पुढे संशयितांनी त्याला कुडाळ येथेच जबर मारहाण केली. त्यात अशपाक याचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी अशपाक याचा मृतदेह व त्याच्या ताब्यातील दुचाकी फोंडाघाट येथे दरीत टाकली व तेथून पसार झाले, अशी माहिती घाटकोपर क्राईम ब्रॅंचच्या तपासात प्राप्त झाली.
संशयित कणकवली पोलिसांच्या ताब्यात
याबाबत घाटकोपर पोलिसांनी कणकवली पोलिसांना कळवले. त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर येथे पोहोचले. हे पथक घाटकोपर येथून कणकवलीला येण्यास निघाले आहे. आता संशयितांनी अशपाक याला नेमके कसे ठार केले, हे पुढील तपासामध्ये स्पष्ट होणार आहे.
घाटकोपर क्राइम ब्रॅंचची उत्कृष्ट कामगिरी
या कारवाईत पोलीस आयुक्त देवन भारती, सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, वैशाली सरवदे, धनाजी साठे, महेश शेलार, स्वप्नील काळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव परबळकर, अरूण सावंत आदी सहभागी झाले होते.
ताजी बातमी
View all








