LIVE UPDATES

'कोकणसाद'च्या 'स्पॉट पंचनाम्या'ला मोठे यश

राज्यातील प्रमुख घाटांवर २४ तास पोलिसांचा खडा पहारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 26, 2026 22:03 PM
views 230  views

  • मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेंची विधानसभेत घोषणा

मुंबई : आंबेनळी घाटातील त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भीषण अपघातानंतर, झोपलेल्या सरकारी यंत्रणेला जागे करण्याचे काम 'कोकणसाद' मीडियाने अत्यंत आक्रमकपणे केले होते. घाटातील जीवघेणे वळण, रस्ता रुंदीकरणाचा संथ कारभार आणि प्रशासकीय अनास्थेचा 'स्पॉट पंचनामा' करून 'कोकणसाद'ने सरकारला धारेवर धरले होते. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील करूळ, भुईबावडा, आंबोली, तिलारी या घाटांचीही बिकट अवस्‍था जनमेसमोर आणली होती. अखेर या मोहिमेला मोठे यश आले असून, राज्य सरकारने आता घाट रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रमुख घाट रस्त्यांवर आता २४ तास पोलिसांची गस्त आणि १०८ रुग्णवाहिका तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

२४ तासांनंतर समोर आला होता अपघात

आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताची माहिती तब्बल २४ तासांनंतर समोर आली होती. माहिती मिळण्यात झालेल्या या अक्षम्य विलंबामुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि काहींना नाहक प्राण गमवावे लागले. यंत्रणेच्या या ढिसाळ कारभारावर 'कोकणसाद'ने रोखठोक बोट ठेवत, खास ग्राऊंड रिपोर्टिंगद्वारे सरकारला जाब विचारला होता. याच मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. तर सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू आणि अस्लम शेख आदी आमदारांनी घाटांमधील रस्ता रुंदीकरण, संरक्षक कठडे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या गंभीर अभावाबाबत सभागृहात प्रश्नांची सरबत्ती केली. आमदारांच्या आणि जनतेच्या संतापाची दखल घेत मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,  "आंबेनळी घाटातील २४.२ किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून 'हायब्रीड अ‍ॅन्यूइटी' योजनेअंतर्गत युद्धपातळीवर सुरू आहे. वास्तविक पाहता, राज्य मार्गावरील घाट रस्त्यांवर रुग्णवाहिका तैनात करण्याची अशी कोणतीही विशिष्ट तरतूद आधी नियमात नव्हती. मात्र, अपघात प्रवण क्षेत्रांचे गांभीर्य आणि जनतेचा आक्रोश पाहता सरकारने आता 'नवीन धोरण' आखले आहे." या नवीन धोरणानुसार, आता राज्याच्या सर्व प्रमुख घाट परिसरांमध्ये १०८ रुग्णवाहिका आणि पोलीस गस्त २४ तास उपलब्ध राहील. जेणेकरून भविष्यात अपघात झाल्यास तातडीने 'गोल्डन अवर'मध्ये मदत मिळून जीवितहानी पूर्णपणे टाळता येईल, असा विश्वास मंत्र्यांनी दिला.

'कोकणसाद'चा दणका; जनतेच्या सुरक्षेचा मार्ग मोकळा !

घाटा घाटांमधील मृत्यूचे तांडव थांबवण्यासाठी 'कोकणसाद'ने प्रशासनाविरुद्ध जी मोहीम उघडली होती, त्याला आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठे यश आले आहे. केवळ घोषणाबाजी न करता, या २४ तास गस्तीची आणि रुग्णवाहिकांची अंमलबजावणी ग्राउंड लेव्हलवर तातडीने व्हावी, यासाठी 'कोकणसाद' यापुढेही खंबीरपणे लक्ष ठेवून राहणार आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026