दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील वरचीवाडीमध्ये बंद घर फोडून लग्नासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या संशयिताला दोडामार्ग पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. हर्ष सूर्यकांत नाईक (वय १९, रा. साटेली वरचीवाडी) असे संशयिताचे नाव असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
साटेली वरचिवाडी येथील रोमाल फर्नांडिस यांच्या बंद घरात झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगामी विवाहासाठी खरेदी करून ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही मौल्यवान वस्तू चोरीस गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने संशयिताच्या घराच्या दिशेने माग काढल्याने तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला. त्याचवेळी तक्रारदारांनीही हर्ष नाईक याच्यावर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
मात्र, चोरीस गेलेले दागिने आणि रोख रक्कम अद्याप हस्तगत झालेली नसून त्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. संशयिताकडून चौकशीदरम्यान वारंवार विसंगत माहिती दिली जात असल्याने तपास अधिक बारकाईने केला जात आहे.
साथीदारांचा शोध; मुद्देमालाचा तपास वेगात
या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? चोरीचा मुद्देमाल कुठे लपविण्यात आला किंवा त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे का? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासाठी मोबाईल कॉल डिटेल्स, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध माहितीची पडताळणी सुरू आहे. तपासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार
संशयिताकडून सातत्याने बदलती माहिती दिली जात असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. त्याने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? या घरफोडीत आणखी किती जण सहभागी होते ? चोरीचा मुद्देमाल कुठे गेला ? याचा उलगडा पोलीस तपासातून होणे अपेक्षित आहे.
ताजी बातमी
View all








