सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगली जिल्ह्यातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. बुधवारी त्याच्यावर आंब्रड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्यार्थ्याचे आई आणि वडील पोलीस खात्यात कार्यरत आहेत. दहावीच्या परीक्षेत त्याने ९३ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्याला पुढील शिक्षणाकरिता सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे पाठविण्यात आले होते. त्याच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये त्याच्याबाबत मोठ्या अपेक्षा होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा विद्यार्थी ईश्वरपूर येथील वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना समोर येताच वसतिगृह प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसतिगृहाच्या लिपिकांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अभ्यासात हुशार आणि उज्ज्वल भवितव्य असलेल्या विद्यार्थ्याच्या अकाली निधनाने आंब्रड गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या विद्यार्थ्याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ताजी बातमी
View all








