राजापूर : मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर कारवाई केली आहे. या कारवाईत 1 कोटी 91 लाख 96 हजार रुपये किमतीची अवैध दारु जप्त करण्यात आली असून कंटेनर चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गोवा बनावटीची दारु वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने राजापूर तालुक्यातील मौजे पन्हाळी तर्फे सौंदळ येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर छापा टाकला.
सहाचाकी कंटेनर गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलमय भागात लपवून ठेवलेला आढळला. पथकाने कंटेनरची तपासणी केली असता गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली दारु आढळून आली. या जप्त करण्यात आलेल्या अवैध दारूची किंमत १ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपये आहे. यावेळी कंटेनरची नंबर प्लेट बनावट असल्याचे आढळून आले.
पथकाचा छापा पडताच कंटेनर चालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांनी अवैध दारु साठा जप्त केला असून फरार चालकाविरुध्द विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त स्नेहलता श्रीकर आणि रत्नागिरी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान अतुल वसावे, विशाल विचारे, मानस पवार आणि अनुराग बर्वे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
ताजी बातमी
View all








