कुडाळ : "नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्व मतदारांनी मला 'स्थानिक उमेदवार' म्हणून जे प्राधान्य दिले, तो माझ्यावरील विश्वास आहे. भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घेताना मी सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करूनच माझी राजकीय वाटचाल निश्चित करेन," असे प्रतिपादन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केले. नेरूर ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिर (नेरूर चव्हाटा) येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे व सौ. दीप्ती नाईक यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पावसकर बोलत होते.
आपल्या विजयाचे श्रेय देताना पावसकर म्हणाले की, "मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते व माजी आमदार वैभव नाईक, शिवसैनिक, मनसे कार्यकर्ते, बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी मला मोलाचे सहकार्य केले. नेरूर पंचक्रोशीतील जनतेने पाठीशी उभे राहिल्यामुळेच मोठ्या 'धनाढ्य' शक्तीसमोर माझा टिकाव लागला."
विकासकामांतून इतिहास घडवा : संग्राम प्रभुगावकर
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "नेरूर मतदारसंघातील मतदारांनी मतदानातून इतिहास घडवला आहे. आता निवडून आलेल्या उमेदवारांनीही तितक्याच ताकदीने विकासकामे करून नवीन इतिहास निर्माण करावा." त्यांच्या हस्ते रुपेश पावसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वैभव नाईक यांच्या शब्दाला जागीन : अतुल बंगे
माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "आम्ही निवडणूक रिंगणात नव्हतो, मात्र माजी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षांत दिलेली साथ आणि ताकद यामुळेच पत्नी अर्चना बंगे हिला उमेदवारी दिली. भविष्यात वैभव नाईक यांचा शब्द कुठेही खाली पडू देणार नाही," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या सत्कार सोहळ्याला नेरूर मतदारसंघातील ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लाड यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
ताजी बातमी
View all








