पणजी : वडोदरा-गुजरात येथील २४ वर्षीय क्षमा बिंदू ही युवती येत्या ११ जून रोजी स्वत:शीच लग्न करून दोन आठवडे हनिमूनसाठी गोव्यात येणार आहे. क्षमा बिंदूच्या या निर्णयाचे तिच्या कुटुंबियांनी स्वागत केले असले, तरी वडोदरातील भाजप प्रमुख सुनीता शुक्ला यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. क्षमाच्या या अनोख्या लग्नावर सोशल मीडियावरही उलटसुटल चर्चा सुरू झाल्या आहेत.
समाजशास्त्रात पदवीचे शिक्षण घेऊन एका खासगी कंपनीत वरिष्ठ नियुक्त अधिकारी म्हणून काम करत असलेल्या वडोदरा येथील क्षमाने ११ जून रोजी स्वत:शीच लग्न करण्याचे निश्चित केले आहे. तिचे आई-बाबा दोघेही अभियंते आहेत. वडील दक्षिण आफ्रिकेत, तर आई अहमदाबादमध्ये असते. क्षमाच्या या निर्णयाचे घरच्यांनी मोकळेपणाने स्वागत केले आहे. भारतात प्रथमच होत असलेल्या अशाप्रकारच्या अनोख्या विवाहाची जय्यत तयारीही सुरू झाली आहे.
आपल्या कपड्यांपासून, दागिने, मेकअप या सगळ्यांचे क्षमाने व्यवस्थित नियोजन केले असून, हिंदू रितीरिवाजाप्रमाणे विधिवत हा विवाह सोहळा होणार आहे. यात केवळ वर आणि वऱ्हाडीच नसणार आहेत. विवाह होताच दोन आठवड्यांसाठी क्षमा गोव्यात हनिमूनसाठी दाखल होणार आहे.
लग्नाला मंदिरात परवानगी देणार नाही : शुक्ला
क्षमाच्या निर्णयाने नाराज झालेल्या भाजप शहरप्रमुख सुनीता शुक्ला यांनी क्षमा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे म्हटले आहे. हिंदू धर्मात अशा लग्नाचा कुठेही उल्लेख नसून हे धर्माच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. क्षमाच्या लग्नाला कोणत्याही मंदिरात परवानगी दिली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
याआधीही झाले आहे असे लग्न!
स्वतःशीच लग्न करण्याला ‘सोलोगॅमी’ असे म्हणतात. अमेरिकेतील लिंडा बार्कर या महिलेने १९९३ मध्ये सर्वप्रथम स्वत:शीच विधिवत लग्न केले होते. या लग्नात त्यांच्या ७५ आप्तेष्टांनीही उपस्थिती लावली होती. हे स्वतःसाठी काहीतरी करण्यासारखे आहे. दुसऱ्या कोणाचीही वाट न पाहता आपण आनंदी राहू शकतो, असा संदेशही बार्कर यांनी त्यावेळी दिला होता.
सोशल मीडियावर लग्नाची खिल्ली
- क्षमाच्या अनोख्या लग्नाबाबतची ब्रेकिंग ‘गोवन वार्ता’ने सोशल मीडियावरून व्हायरल केल्यानंतर त्यावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
- असे लग्न करून क्षमा बिंदू फुकटची प्रसिद्धी मिळवू पाहत असल्याचे काहींचे मत आहे. तर, क्षमा गोव्यात येऊन हनिमून कोणासोबत साजरा करणार, असा प्रश्न काहींनी केला आहे. ‘माणसे दुरावली, माणसावरचा विश्वास उडाला तर कदाचित असेच होते’, असे एकाने म्हटले आहे. तर, ‘सगळे विकृत आणि मानसिक रुग्ण गुजरातचेच कसे काय?’ असे म्हणत एका युजर्सने नाव न घेता काहींवर निशाणा साधला आहे.
ताजी बातमी
View all








